▪️मूल शहरात मालधक्क्याला तिव्र विरोध..!
▪️पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर..

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : सूरजागड लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी मूल रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा ‘मालधक्का’ सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे मूल शहरात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाविरोधात ‘मूल शहर बंद’ ठेवून मोठे आंदोलन करण्याचा इशारा आता शहरवासीयांनी दिला आहे.
▪️प्रमुख समस्या आणि नागरिकांचे आक्षेप – १.आरोग्य आणि धूलिकणांचा धोका : रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ उपजिल्हा रुग्णालय आहे. लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे उडणारी ‘लाल धूळ’ थेट रुग्णालयात आणि परिसरात पसरेल. यामुळे दमा (Asthma), ब्रॉन्कायटिस यांसारख्या श्वसनाचे गंभीर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे. अहेरी आणि आलापल्ली येथील गावे ज्याप्रमाणे लाल धुळीमुळे बाधित झाली आहेत, तशीच अवस्था मूल शहराची होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
२.खेळाडू आणि वृद्धांचे एकमेव मैदान धोक्यात : शहरात फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी रेल्वे स्थानकाला लागून असलेले एकमेव मैदान उपलब्ध आहे. येथे पहाटेपासून सैन्य भरतीची तयारी करणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक व्यायामासाठी येतात. मालधक्का सुरू झाल्यास जड वाहनांची वर्दळ वाढून या मैदानाची शांतता भंग होईल आणि धुळीमुळे व्यायाम करणे कठीण होईल.
३.विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका : रेल्वे स्थानक परिसरात नामांकित कॉलेज आणि शाळा आहेत. शहरात बायपास रस्ता उपलब्ध नसल्याने खनिजाची वाहतूक करणारी जड वाहने शहरातूनच जातील. यामुळे अपघातांचा धोका वाढून शाळकरी मुला-मुलींच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
४. पर्यावरणाचा ऱ्हास
मालधक्क्याच्या विस्तारासाठी रेल्वे स्थानक परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन निसर्गरम्य शहराचे वाळवंट होईल, असा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
५.रोजगाराचा अभाव आणि स्थानिक अन्याय
स्थानिकांचा असा आरोप आहे की, मालधक्क्यावर कामासाठी बाहेरून मजूर आणि लोक आणले जातात. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची कोणतीही संधी मिळत नाही. उलट, आरोग्याचे नुकसान आणि वाहतुकीची कोंडी मात्र स्थानिकांच्या वाट्याला येते.
यापूर्वीही स्थानिकांच्या विरोधामुळे हा मालधक्का केळझर येथे हलवण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा तो मूल शहरात आणण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर संपूर्ण मूल शहर बंद ठेवून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक संघर्ष समितीने दिला आहे.



