आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या वतीने” मालधक्का हटाव” साठी जनजागृती मोहीम सुरु..

▪️मूल शहर वासियांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : गेल्या काही दिवसांपासून मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोहखनिजाची देशभर वाहतूक करण्याची योजना सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी काही राजकीय नेत्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप असून, या पार्श्वभूमीवर “मूल शहर बचाव संघर्ष समिती”च्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.
मूल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला. प्रस्तावित मालधक्का उभारल्यास स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळणार नसून, केवळ काही स्वार्थी घटकांना लाभ होणार असल्याचा आरोप करण्यात आला. रोजगाराचे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मालधक्क्यामुळे मूल शहराला जलप्रदूषण, वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. परिणामी, सध्या स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळख असलेले मूल शहर प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
तसेच, दररोज सुमारे ७००ते ८०० अवजड (हायवा) वाहनांची वाहतूक होणार असल्याने अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सुरजागड परिसरातून होणाऱ्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान बारीक धूळ आणि रासायनिक घटक हवेत व जमिनीवर पसरून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे परिसर लालसर होण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
प्रस्तावित मालधक्क्याच्या लगतच कर्मवीर महाविद्यालयाचे सार्वजनिक मैदान आहे. येथे दररोज नागरिक व्यायामासाठी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. या परिसरात मालधक्का उभारल्यास अशा उपक्रमांवर परिणाम होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
याशिवाय, नवभारत विद्यालय, नवभारत कन्या विद्यालय, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कर्मवीर महाविद्यालय तसेच पंचायत राज प्रशिक्षण केंद्र या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था मालधक्क्याच्या परिसरात असल्याने त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित मालधक्का हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असून, या परिसरात वाघ, अस्वल, बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आहे. हा भाग वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाचा (कॉरिडॉर) भाग असल्याने मालधक्का उभारल्यास वन्यजीवांचे नुकसान होण्याची तसेच मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
मूल शहरातून सुरजागड येथील लोहखनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित रेल्वे मालधक्का तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी मूल शहर बचाव संघर्ष समितीने केली आहे. अन्यथा, विविध स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
या पत्रकार परिषदेला समितीचे पदाधिकारी, सदस्य, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.