◼️जंगल सफारी गेट; वन्य प्राणी आणि गावकऱ्यांचे प्रश्न

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: (इंडीया २४ न्यूज)
चंद्रपूर जिल्ह्यात आज अनेक जंगल परिसरात नवीन सफारी गेट सुरू केले जात आहेत. सरकार आणि वनविभाग यांच्या मते यामुळे पर्यटन वाढते, जंगल संवर्धनाला मदत होते आणि स्थानिकांना रोजगार मिळतो. परंतु जंगलालगत राहणाऱ्या गावकऱ्यांच्या दृष्टीने या प्रश्नाची दुसरी बाजूही आहे. जंगलावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या लोकांना असे वाटते की सफारी गेटमुळे काही मोजक्या लोकांनाच फायदा होतो. तर बहुसंख्य गावकरी अजूनही संकटात जीवन जगत आहेत.
गावातील अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह जंगलावर अवलंबून असतो. मोहफुले गोळा करणे, तेंदूपत्ता संकलन, मध, लाकूड, आणि वनऔषधी यामधून हजारो लोकांना हंगामी रोजगार मिळतो. विशेषतः आदिवासी आणि गरीब कुटुंबासाठी हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असते. त्यामुळे जंगल हे त्यांच्यासाठी केवळ पर्यटन स्थळ नसून जीवनाचा आधार असतो.
दुसरीकडे जंगलात वाघ, बिबट्या अस्वल यासारख्या हिंस्त्र प्राण्याची संख्या वाढल्याने मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढत आहे. अनेक वेळा मोहफुले किंवा तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या लोकांवर वाघाचे हल्ले होतात. काहींना जीव गमवावा लागतो. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि नाराजी निर्माण होते. “जंगलात हिंस्त्र प्राणी वाढवून, आमच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर त्याचा फायदा कोणाला? असा प्रश्न अनेक गावकरी विचारतात.
सफारी गेटमुळे काही युवकांना मार्गदर्शक, वाहन चालक, किंवा रिसॉर्टमध्ये काम मिळते, हे खरे आहे. पण हा रोजगार फार मर्यादित असतो. संपूर्ण गावाच्या तुलनेत फक्त दहा- वीस लोकांना थेट फायदा मिळतो. त्यामुळे पर्यटनातून मिळणारा पैसा आणि विकास याचा लाभ सर्वसामान्य गावकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. अशी भावना निर्माण होते.
तथापि, वन्यप्राणी जंगलाचे संरक्षणासाठी तितकेच आवश्यक आहे. वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलातील पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवतात. जंगल टिकले तर पाणी, हवामान आणि जैवविविधता सुरक्षित राहते. शेती आणि मानवी जीवनालाही त्याचा दीर्घकालीन फायदा होतो. म्हणूनच जंगल आणि वन्यजीव संरक्षण पूर्णपणे थांबवणे हा उपाय नाही.
खरी गरज आहे ती संतुलनाची, गावकऱ्यांची सुरक्षा, योग्य नुकसान भरपाई, वनउत्पादनावरील हक्क, सुरक्षित जंगल प्रवेश, स्थानिकांसाठी अधिक रोजगार, आणि पर्यटनातील उत्पन्नाचा गावाच्या विकासासाठी वापर- या गोष्टी एकत्रितपणे झाल्या तरच जंगल संवर्धनाला लोकांचा पाठिंबा मिळू शकतो.
गुंजेवाही येथे तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या चार महिलांना एकाच वेळी वाघाने ठार मारले. ही अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक घटना आहे. एकाच वेळी वाघाचे हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू होणे म्हणजे संपूर्ण परिसरासाठी मोठा धक्का असतो. अशा घटना फक्त आकडे नसतात. त्या कुटुंबाचे आधार हरपतात, लहान मुले आईविना होतात आणि गावात कायमची भीती निर्माण होते.
अशा परिस्थितीत गावकऱ्याचा संताप आणि प्रश्न स्वाभाविक असतात:
▪️ जंगलात रोज उपजीविकेसाठी जाणाऱ्यांचे संरक्षण कोण करणार?
▪️फक्त पर्यटन आणि सफारी वाढवून सामान्य लोकांच्या जीवितांची जबाबदारी कोण घेणार?
▪️वनविभागाने पुरेशी सुरक्षा, गस्त आणि व्यवस्था का केली नाही?
तेंदुपत्ता, मोहफुले आणि इतर उत्पादनावर अनेक गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे “जंगलात जाऊ नका” असे सांगणे व्यवहार्य नसते. म्हणूनच अशा भागात;
▪️ वनरक्षकाची गस्त
▪️ वाघाच्या हालचालीची माहिती,
▪️सुरक्षित वेळा
▪️ आणि तातडीची नुकसान भरपाई व मदत या गोष्टी प्रभावीपणे राबवणे आवश्यक असते.
“तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नाही तर जंगल परिसरातील लोकांच्या असुरक्षित जिवनाचे वास्तव्य आहे. एका बाजूला जंगलपर्यटन आणि सफारी गेटचे उद्घाटन केले जाते. तर दुसऱ्या बाजूला रोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जाणाऱ्या गरीब महिलांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतो. जंगल संवर्धनासोबत जंगलावर जगणाऱ्या माणसाच्या सुरक्षेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.
फक्त नवीन सफारी गेट उघडणे म्हणजे विकास नव्हे. जंगलात राहणाऱ्या माणसाच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांना न्याय दिला, तरच जंगल, वन्यप्राणी आणि गावकरी यांच्यात खरी सहअस्तित्वाची भावना निर्माण होईल.



