▪️रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई..
▪️"गुटखा माफियांवर चंद्रपुर पोलिसांचा मोठा प्रहार, दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मिनी मोक्का ची कारवाई..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 111 (संघटित गुन्हेगारी) लागू केले आहे.
पोलीस स्टेशन रामनगर येथे दाखल अपराध क्र. 658/2026 व अपराध क्र. 664/2026 च्या तपासादरम्यान आरोपी हे संघटित पद्धतीने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्री करून आर्थिक लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून सातत्याने अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात आढळून आले.
अपराध क्र. 658/2026 मध्ये टोळी प्रमुख वसीम अक्तर झिमरी, रा. घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर तसेच सदस्य सिद्धांत माधव गोंडाणे व मो. अखिल शकील शेख यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता.
तसेच अपराध क्र. 664/2026 मध्ये टोळी प्रमुख जयसुखलाल अंबाराम ठक्कर, रा. विवेकानंद वॉर्ड, बल्लारपूर तसेच सदस्य अजयकुमार विजयकुमार गुंडोजवार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.
तपासादरम्यान संबंधित टोळी प्रमुख व सदस्यांविरुद्ध चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता अंतर्गत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे करण्यात येत असल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 111 (संघटित गुन्हेगारी) अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
जनतेच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. आयुष नोपानी, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोलीस स्टेशन रामनगर यांच्या नेतृत्वात तपासी अधिकारी पो.उप.नि. हिराचंद गव्हारे व सपोनि सचिन राखोंडे यांनी पूर्ण केली.



