आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️८ वर्षापासून मंजूर असूनही सुद्धागुडम-मरपल्ली रस्ता कागदावरच..

▪️अखेर ग्रामस्थांचा उद्रेक, उमानूर येथे अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन...

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

अमेरी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील सुद्धागुडम ते मरपल्ली हा अत्यंत महत्वाचा रस्ता शासनाने तब्बल ८ वर्षापूर्वी मंजूर करूनही प्रत्यक्षात एक इंचही काम सुरू न झाल्याने अखेर हजारो नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला.

रस्त्याच्या दुरवस्थेसोबतच परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्कचा पूर्ण अभाव आणि करंचा, रेगुलवाही येथील नाल्यांवरील जीर्ण व धोकादायक पुलिया यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी उमानूर मेन रोड चौक येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य शांततामय चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

सुद्धागुडम, मरपल्ली, रेगुलवाही, करंचा, उमानूरसह १५ ते २० गावांमधील हजारो आदिवासी बांधव, महिला, युवक, शेतकरी आणि विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पावसाळ्यात चिखलाच्या दलदलीतून जीव धोक्यात घालून करावी लागणारी पायपीट, गरोदर महिलांना आणि गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे, शेतमाल बाजारात नेता न येणे या वेदना ग्रामस्थांनी यावेळी मांडल्या.

यावेळी बोलताना डॉ. अजयभाऊ कंकडालवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शासन दरबारी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. हा लढा केवळ एका रस्त्याचा नसून या भागातील आदिवासी बांधवांच्या स्वाभिमानाचा आणि मूलभूत हक्कांचा आहे. जोपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुद्धागुडम-मरपल्ली रस्त्याची पुण्य निविदा दि. १२/०२/२०२६ रोजी काढण्यात आली असून तांत्रिक छाननी पूर्ण झाली आहे. मात्र शासनाकडे निधीअभावी फायनान्शियल लिफाफा उघडणे प्रलंबित असून दि. १८/०३/२०२६ रोजी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच किंवा पुढील २ ते ३ महिन्यात रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मरपल्ली-रेगुलवाही रस्त्याचे पॅचेस दिवाळीनंतर नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

या आंदोलनाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना आणि महिला बचत गटांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय मार्गाने पार पडले.

आता प्रशासन आपले आश्वासन पाळते की पुन्हा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.