आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कोणसरीत लायड्स मेटल कंपनीचा हुकूमशाही कारभार, शेतजमीन हडप करण्याचा आरोप..

▪️ग्रामस्थांचा संताप उसळला मोठ्या आंदोलनाची चेतावणी..

*उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील कोणसरी गावात लायड्स मेटल कंपनीचे सुरू असलेले काम व त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया यावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवत कंपनीवर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे. पिढीजात शेतजमिनी बळजबरीने हडप करण्याचा कंपनीचा उघड डाव असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कंपनीचे दलाल, अधिकारी आणि सरकारी ताफा घेऊन थेट शेतजमिनींच्या सीमेत घुसून मोजणीचे काम सुरू आहे. फॉर्म-C वर जबरदस्तीची सही करण्याचा दबाव, कागदपत्रांकडे दुर्लक्ष, तसेच जमीनमालकांना गुन्हेगार ठरविण्याच्या धमक्या — या सर्व प्रकारांमुळे गावकरी संतप्त झाले आहेत. कंपनीने नियोजनबद्ध पद्धतीने ‘जमीन द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा’ असा दबाव आणून शेतकऱ्यांना घेरण्याचे काम सुरू केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

“आमची पिढीजात शेती आम्ही देणार नाही; कंपनीचा एकही फावडा जमिनीत घुसू देणार नाही. गरज पडली तर रस्त्यावर उतरू,” असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असतानाही कंपनी आणि प्रशासन न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करून कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचाही आरोप करण्यात आला.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, कंपनीला जमीन मिळावी म्हणून विभागीय पातळीवरून सरकारी यंत्रणा सक्रिय झाली असून गावकऱ्यांना न विचारता कागदपत्रे तयार करणे, जागेवर तपासणीचे नाटक करणे आणि दबाव टाकणे हे प्रकार सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. लायड्स मेटल कंपनीची दादागिरी थांबवूनच दम घेऊ, असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला.

पत्रकार परिषदेला गणेश कोटरंगे, विकास मोहुर्ले, सोनू कावळे, कुशाब गोडबोले, अभय गद्दे, रोहन मडावी, दशरथ करपते, आनंदराव मडावी, भाऊजी कावळे, सुरेश करपते व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.