मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!
आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालकांकडे मागणी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर ( इंडिया 24 न्युज ) : मोरवा येथील अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या संतापजनक घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांना सविस्तर पत्र पाठवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर पोस्को कायद्यान्वये कठोरात कठोर कारवाई करून तातडीने शिक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे. अशा अमानुष आणि विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही दयामाया दाखवू नये, पीडित चिमुकलीला त्वरित न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी ठाम भूमिका आ.मुनगंटीवार यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचाराचा प्रयत्न ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी घटना आहे. अशा नराधमांविरुद्ध पोस्को कायद्यासह सर्व संबंधित कायद्यांनुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तपासात कोणतीही दिरंगाई न करता दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करून पीडित बालिकेला जलद न्याय मिळेल, यासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई, तपास युद्धपातळीवर पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करणे तसेच पीडित बालिका व तिच्या कुटुंबाला आवश्यक संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भाजपा महिला मोर्च्याच्या नम्रता ठेमस्कर, हिना शेख, रूपाली आंबटकर, समिस्ता फारुखी, मनोज ठेंगणे, संगीता भट, मंजुषा अतकरे, सुनंदा वरखेडे, उषा वरखेडे, सुमित्रा मते, कौशल्या मते, अनुराधा नागरगोजे, स्वाती नाईकवाडे, रोशनी सिंग, पुष्पलता उरकुडे, कविता अंबुरकर तसेच वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा विकृत आणि अमानुष प्रवृत्तीच्या नराधमांविरुद्ध कायद्याचा कठोर धाक निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता पोस्को कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी, तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करावे तसेच पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला आवश्यक संरक्षण आणि शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी या प्रकरणात कठोर व प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पोलिस महासंचालक आणि चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.



