आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पालकमंत्र्यांचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद..

▪️चंदनखेडा येथील आश्रमशाळेला भेट व पाहणी, विद्यार्थ्यांसोबत पंगतीत जेवणाचा आस्वाद..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि.19 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी 16 ऑगस्ट रोजी, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, चिमूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, सहायक प्रकल्प अधिकारी एम.व्ही. डुले, चंदनखेडाचे सरपंच नयन जांभुळे, शाळेचे मुख्याध्यापक जी.बी. सोनोने, अधिक्षक डी.टी. पोटदुखे, अधिक्षिका के. व्ही. गाडगे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आपण येथे शिक्षणासाठी आलो आहोत. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होऊन आई-वडीलांचे नाव मोठे करा. तुमचा आत्मविश्वास वाढावा, अधिका-यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर असावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातील कलेक्टर, एसपी, सीईओ, आयुक्त असे वरिष्ठ अधिकारी तुमच्या भेटीसाठी येथे आले आहेत. आश्रम शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये टिकण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी महिन्यातून एकदा त्यांना स्पर्धा परिक्षांबद्दल मार्गदर्शन करावे.

येथील विद्यार्थी आपला केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावे. त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांमुळेच आपल्याला पगार मिळतो, त्या पगारातून आपले कुटुंब चालते, याची जाणीव ठेवून काम करा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक एक साखळी आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य कायम असावे. ही आश्रमशाळा अतिशय चांगली आहे, तिला नेहमी अग्रेसर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवा, अशा सुचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

शाळेमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध करून द्या, अशी मागणी एका विद्यार्थ्याने केली. यावर तात्काळ प्रतिसाद देत, शाळेला एक क्रीडा शिक्षक देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी लॅब तसेच मॅथ्स लॅबचे उद्घाटन केले.

विद्यार्थ्यांसोबत पंगतीत जेवण : यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश व इतर अधिका-यांनी विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.