▪️धानोरा मार्ग धुळीत! प्रशासन झोपलेय का? बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह : राहुल वैरागडे

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
धानोरा – ( इंडिया 24 न्युज ) : : गडचिरोली–धानोरा मार्गावरील काकाडयेली ते धानोरा दरम्यान रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध, महिला आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ व इतर त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील पिकांवरही धुळीचा थर साचत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. तसेच परिसरातील पर्यावरणावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. धुळीमुळे वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
धुळीचा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभागाने दिवसातून किमान चार वेळा रस्त्यावर पाण्याचा मारा करावा, अशी मागणी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे.
रस्त्याची अशी अवस्था असताना संबंधित बांधकाम विभागाकडून आवश्यक उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करायचा की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम विभाग डोळे झाकून बसले आहे का?” असा संतप्त सवाल राहुल वैरागडे यांनी केला.
बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावर नियमित पाण्याचा मारा करण्यासह आवश्यक उपाययोजना त्वरित कराव्यात. नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी राहुल वैरागडे यांनी केली.



