आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️खाणी बनल्या कचराकुंड्या: आंबोली – रामाळा मार्गांवरील साचलेल्या पाण्याची दुर्गंधी, नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही : (इंडिया २४ न्युज )
सिंदेवाही तालुक्यातील आंबोली – रामाळा मार्गावर असलेल्या जुन्या दगड खाणीमध्ये नगरपंचायतीमार्फत कचरा टाकला जात असल्याने, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी उन्हाळ्यात पाण्याची तिव्र टंचाई भासणार असून, या खाणीची तातडीने स्वच्छता करून ती वापरायोग्य करावी, अशी जोरदार मागणी आंबोली वासीयाकडून केली जात आहे.

ग्रामपंचायत काळात परिस्थिती उत्तम

पूर्वी आंबोली हे गाव रामाळा ग्रामपंचायतीतंर्गत येत होते. त्यावेळी या दगडखाणीमधील पाणी स्वच्छ राहायचे. खाणी खोलगट असल्याने उन्हाळ्यातही तिथे मुबलक पाणीसाठा असायचा. त्यामुळे परिसरातील नागरिक कपडे धुण्यासाठी आणि जनावरांना पाणी पाजण्यासाठी या पाण्याचा वापर करत असत. मात्र, सिंदेवाही ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आंबोली गावाचा समावेश नगरपंचायतीमध्ये करण्यात आला.

कचरा व प्लास्टिकमुळे दुषीत झाले पाणी

नगरपंचायतीत समावेश झाल्यानंतर आंबोली येथील दगड खाण्याच्या परिसरात सिंदेवाही शहरातील प्लास्टिक, सुका व ओला कचरा आणून टाकला जात आहे. यामुळे एकेकाळी पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या या खाणींना आता ” कचराकुंडी ” चे स्वरूप आले आहे. कचऱ्यामुळे पाण्याचे प्रदूषण झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. “ग्रामपंचायतीच्या काळात परिस्थिती खूप चांगली होती,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची मागणी

यंदा तालुक्यात अपुरा पाऊस पडल्याने परिसरातील नदी, नाले कोरडे पडू लागले आहेत. येत्या काळात भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अशा परिस्थितीत जर नगरपंचायतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून या खाणीतील कचरा हटवला व गाळ काढला, तर हे पाणी जनावरासाठी व इतर दैनंदिन कामासाठी उपयुक्त ठरेल.

त्यामुळे सिंदेवाही नगरपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, आंबोलीओ – रामाळा मार्गावरील खाणीची तात्काळ साफसफाई करावी आणि कचरा टाकणे थांबवावे, अशी आग्रही मागणी आंबोली – रामाळा येथील ग्रामस्थांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.