▪️शेड उभारून प्रसिद्धी नको, घुग्घुसच्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी CSR निधी वापरा!
▪️लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या शिक्षणविषयक CSR उपक्रमावर सुरेशभाऊ पाईकराव विदर्भ सचिव आजाद समाज पार्टी यांच्या प्रश्न?

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
घुग्घुस – ( इंडिया 24 न्युज ) : घुग्घुस परिसरात लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून शिक्षणाच्या नावाखाली विविध ठिकाणी टिन/पत्र्यांचे शेड उभारण्याचे काम झाले आहे. म्हातारदेवी परिसरात लॉयडस मेटल कंपनीचा कॉलनीमध्ये कंपनीची गोएंका खाजगी/प्रायव्हेट शाळा यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. कंपनीने शिक्षण क्षेत्रात उपक्रम राबवणे ही सकारात्मक बाब आहे. मात्र घुग्घुसच्या स्थानिक गरजू विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न यापेक्षा मोठा आहे.
आज घुग्घुसमध्ये अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींमध्ये जीवन जगत आहेत. आपल्या मुलांना महागड्या खासगी शाळेत शिक्षण देण्याची आर्थिक क्षमता अनेक पालकांकडे नाही. दुसरीकडे, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत असून खासगी/प्रायव्हेट शिक्षणव्यवस्थेचा विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत केवळ टिनचे शेड उभारून शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी पूर्ण झाल्याचा आभास निर्माण करणे हा प्रश्न सोडवण्याचा कायमस्वरूपी मार्ग नाही, असा प्रश्न सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांचा आहे.
लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेडने जर खरोखरच घुग्घुसच्या विकासासाठी CSR च्या माध्यमातून घुग्घुस शहरामध्ये काम करायचे असेल, तर कंपनीने स्थानिक गरजू विद्यार्थ्यांसाठी आपल्या गोएंका शाळेची दारे खुली केली पाहिजे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना खासगी/प्रायव्हेट शिक्षणाचा खर्च परवडत नाही, अशा मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, गणवेश, डिजिटल शिक्षणाच्या सुविधा आणि आवश्यक शैक्षणिक मदत देण्यासाठी कंपनीने ठोस पाऊल उचलुन योजना जाहीर करावी.
आमचा स्पष्ट प्रश्न आहे.
शाळेवर पत्र्याचे शेड उभारणे महत्त्वाचे की त्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे महत्त्वाचे?
इमारतीला टिन/पत्रे लावून विकासाचे फोटो काढणे सोपे आहे. पण एका गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे.
कंपनीच्या CSR चा पैसा केवळ दिसणाऱ्या कामांवर खर्च करण्याऐवजी त्याचा दीर्घकालीन आणि थेट लाभ होईल असा स्थानिक नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळाला पाहिजे, अशी आमची माझी ठाम भूमिका आहे.
घुग्घुसच्या जमिनीवर उद्योग उभे राहतात, स्थानिक परिसरातील नैसर्गिक संसाधनांचा वापर होतो आणि स्थानिक समाजावर उद्योगांचा विविध प्रकारे परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी कंपनीने केवळ औपचारिकता न करता ठोस, मोजता येईल असा आणि दीर्घकालीन शैक्षणिक उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.
आमच्या प्रमुख मागण्या :
1. कंपनीच्या शाळेत घुग्घुसमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी निश्चित जागा राखीव ठेवाव्यात.
2. पात्र गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा द्यावी.
3. त्या विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे.
4. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, डिजिटल शिक्षण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
5. CSR अंतर्गत शिक्षणासाठी किती निधी मंजूर व खर्च केला, याची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी.
6. घुग्घुसमधील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दीर्घकालीन योजना राबवावी.
7. CSRच्या कामांची निवड करताना स्थानिक नागरिक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांचा सहभाग घ्यावा.
शेडपेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्या!
घुग्घुसच्या जनतेला केवळ दिसणारी विकासकामे नकोत. आपल्या मुलांच्या भवितव्याची हमी देणारे शिक्षण हवे आहे.
टिनचे शेड काही वर्षे उपयोगी पडेल.
पण एका गरीब विद्यार्थ्याला दिलेले दर्जेदार शिक्षण त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.
त्यामुळे लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने दिखाऊ कामांपेक्षा स्थानिक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव विदर्भ सचिव आजाद समाज पार्टी व
घुग्घुसच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
घुग्घुसच्या मुलांच्या भवितव्याशी तडजोड नको!
CSR चा पैसा — स्थानिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा!
शेड नको असे नाही, पण शेडपेक्षा शिक्षणाला पहिले प्राधान्य द्या!
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव
विदर्भ सचिव, आजाद समाज पार्टी



