ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

✒️“सत्याच्या आवाजाला कैद करता येत नाही”..!! गजानन हरणे, समाजसेवक

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : मेणबत्त्यांच्या उजेडात लोकशाहीचा प्रश्न सायंकाळी सूर्यास्तानंतर अकोल्याच्या रस्त्यांवर हजारो हातांत मेणबत्त्या पेटल्या होत्या. त्या केवळ प्रकाशाच्या ज्योती नव्हत्या; त्या होत्या लोकशाहीच्या, स्वातंत्र्याच्या आणि सत्यासाठी लढणाऱ्या आवाजांच्या मशाली. देशातील शांती, विज्ञान, शिक्षण आणि पर्यावरण यांसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या लडाखच्या गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मा. सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला होता.
शांततेच्या मार्गाने, संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या चौकटीत लोकांनी सरकारविरोधात आपला असंतोष व्यक्त केला. घोषणांनी अकोल्याचा आकाश दुमदुमून गेला “सोनम वांगचूक यांना तातडीने मुक्त करा!”, “पर्यावरण रक्षकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही!”, “शांततेच्या मार्गाने लढणाऱ्या विचारांना सलाम!”या ज्योती फक्त मेणबत्त्यांच्या नव्हत्या, त्या सत्याच्या होत्या. त्या सांगत होत्या विचारांना कैद करता येत नाही, सत्याला तुरुंगात डांबता येत नाही, आणि लोकशाहीला दबावाखाली ठेवता येत नाही.

सोनम वांगचूक लडाखचा गांधी आणि नवभारताचा स्वप्नद्रष्टा

“३ इडीयट्स” चित्रपटातील फुंसुख वांगडू ही व्यक्तिरेखा जिच्या जीवनावर आधारित आहे तो खरा मनुष्य म्हणजे सोनम वांगचूक अभियंता, शिक्षण सुधारक, पर्यावरण योद्धा आणि समाजमनाचा शास्त्रज्ञ. लडाखच्या कठीण भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीत त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि पर्यावरणाला लोकजीवनाशी जोडण्याचे काम केले. सेक मॉल स्कुल्स आणि हिमनदी साठवण प्रकल्पांद्वारे त्यांनी दाखवून दिले की विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा नव्हे तर जीवन बदलण्याचे साधन आहे.ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर नवभारताचे स्वप्न पाहणारे विचारवंत होते. त्यांचे काम सांगते की विकास हा निसर्गाचा विध्वंस करून नव्हे तर त्याच्याशी मैत्री करून शक्य आहे. त्यांनी शाश्वत ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले, स्थानिकांना स्वयंपूर्ण केले, आणि शिक्षणात प्रयोगशीलतेचा नवा अध्याय लिहिला. त्यामुळेच लोक त्यांना लडाखचा गांधी म्हणतात कारण ते शांततेच्या मार्गाने परिवर्तन घडवतात, सत्यावर ठाम राहतात आणि जनतेला जागृत करतात.

अटक विरोधकांना गप्प करण्याचे षड्यंत्र.

अशा एका प्रज्ञावान, निरपेक्ष, राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्वाला सरकारने तुरुंगात डांबले. त्यांचा “गुन्हा” एवढाच त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला, पर्यावरणाच्या नाशावर आवाज उठवला, लोकशाहीच्या मूल्यांचे स्मरण करून दिले. ही अटक केवळ एका व्यक्तीची नाही ती म्हणजे विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरील हल्ला.आजच्या भारतात सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलणे म्हणजे “देशद्रोह”. जो प्रश्न विचारतो तो “शत्रू”. जो सत्य सांगतो तो “कट्टर”. लोकशाहीचे चौथे स्तंभ ,माध्यमे, विद्यापीठे, समाजसंस्था यांनाही दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या मतभेदांना गुन्हा ठरवले जात आहे.
हे दृश्य नवीन नाही. इतिहासात जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अहंकाराला आव्हान देणारे आवाज ऐकू आले, तेव्हा त्यांनी त्या आवाजांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा इतिहासाने प्रत्येक वेळी सिद्ध केले विचार कधीच तुरुंगात बंद होत नाहीत.

लोकशाही ते ठोकशाही इतिहासाची पुनरावृत्ती

ब्रिटिश सत्तेखाली भारताने हेच पाहिले होते. महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलन सुरू केले, आणि त्यांनाही कारागृहात टाकले गेले. भगतसिंग, राजगुरू, सावरकर, नेताजी सर्वांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीला तोंड दिले. पण त्यांच्या तुरुंगवासाने विचार संपले नाहीत; उलट ते जनमानसात अधिक प्रखर झाले.आजही तीच परिस्थिती पुन्हा येत आहे. फरक इतकाच की आता सत्ता इंग्रजांची नाही, तर भारतीयांची आहे. पण सत्ता मिळताच काही जण इंग्रजांपेक्षाही निष्ठुर झाले आहेत. जो विरोध करतो तो देशद्रोही ठरतो, जो प्रश्न विचारतो तो शत्रू ठरतो. हेच ठोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाहीत सत्ता प्रश्नांची उत्तरे देते; ठोकशाहीत सत्ता प्रश्न विचारणाऱ्यांनाच संपवते.
ऐतिहासिक संदर्भ सत्यासाठी लढणाऱ्यांचे दमन .स्वातंत्र्य संग्रामात असंख्य सत्यवादी आणि क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी गप्प करण्याचा प्रयत्न केला. पण गांधींनी म्हटले होते “ते मला तुरुंगात टाकू शकतात, पण माझ्या विचारांना नाही.” नेल्सन मंडेला यांनी २७ वर्षे तुरुंगात घालवली, पण दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा अंत झाला. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांना सतत धमक्या दिल्या गेल्या, पण त्यांनी अमेरिकेत नागरी हक्कांचा नवा अध्याय लिहिला.
आज सोनम वांगचूक यांच्या अटकेतून इतिहास पुन्हा एकदा स्वतःला पुनरावृत्त करत आहे. पण इतिहासाने हेही दाखवून दिले आहे की सत्याच्या बाजूने लढणारे शेवटी जिंकतात. सत्ता क्षणभंगुर असते; विचार चिरंतन असतात.आजचा काळ संविधान वाचवण्याची आणि जनतेला जागृत करण्याची जबाबदारी लोकशाही ही केवळ निवडणुकीत मतदान करण्याचे नाव नाही. ती आहे मतभेदांचा स्वीकार, विचारस्वातंत्र्याचे रक्षण आणि सत्यासाठी आवाज उठवण्याची हमी. आज भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे .लोकशाहीचे रक्षण.सोनम वांगचूक यांच्या अटकेनंतर एक प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारावा लागेल आपण शांत राहिलो तर उद्या आपला आवाज कोण ऐकेल?आज जर आपण त्यांच्या बाजूने उभे राहिलो नाही, तर उद्या आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला जाईल. ही लढाई फक्त एका व्यक्तीची नाही, ती आहे प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांची.म्हणूनच आज गरज आहे लोकांनी रस्त्यावर उतरायची, संविधान हातात घ्यायची, आणि लोकशाही वाचवण्याची. जात, धर्म, पंथ, पक्ष या सगळ्या भिंती मोडून एकत्र येण्याची. नेपाळमध्ये जेव्हा सरकार हुकूमशाहीकडे वळले, तेव्हा सामान्य लोकांनी रस्त्यावर उतरून लोकशाही परत आणली. भारतातही तीच वेळ आली आहे.

अकोल्यातून उठलेली ठिणगी आशेचा किरण

अकोला शहरातील सज्जनशक्तीने या ठोकशाहीविरोधात आवाज उठवून आशेची ठिणगी पेटवली आहे. गांधी जवाहर बागपासून हुतात्मा स्मारकापर्यंतचा कॅण्डल मार्च हे केवळ आंदोलन नव्हते; ते होते एक वचन सत्यासाठी लढा देण्याचे, लोकशाही वाचवण्याचे, विचारांना कैद न होऊ देण्याचे.
विविध विचारांचे, धर्मांचे, संघटनांचे , पक्षाचे लोक एकत्र आले. ही एकजूट सांगते की लोकशाहीवर हल्ला हा फक्त एका पक्षावर किंवा धर्मावर नव्हे तर संपूर्ण देशावर असतो.
या मार्चमध्ये पेटलेल्या मेणबत्त्या सांगतात अंधार कितीही दाटला तरी प्रकाशाचा एक किरण त्याला छेदून जातो. आणि तो किरण आहे “जनता”.
विचारांना कैद करता येत नाही, लोकशाही वाचवणे हेच राष्ट्रसेवा सोनम वांगचूक यांची अटक ही एक व्यक्तीची नाही ती संपूर्ण विचारप्रणालीवर हल्ला आहे. हा हल्ला शिक्षणावर आहे, विज्ञानावर आहे, पर्यावरणावर आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या लोकशाहीवर आहे. पण इतिहासाचा अनुभव सांगतो सत्ता विचारांना संपवू शकत नाही. ती माणसाला तुरुंगात टाकू शकते, पण विचारांना नाही.आज प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतःकरणात हा प्रश्न विचारावा आपण शांत राहणार का?
जर आपण शांत राहिलो, तर पुढील पिढ्यांना आपण लोकशाहीचा सूर्य नव्हे तर ठोकशाहीचा अंधार देऊन जाऊ. पण जर आपण जागे झालो, एकत्र आलो, तर आपण या अंधाराला छेदून नवा पहाट आणू शकतो.सोनम वांगचूक हे आज तुरुंगात असतील, पण त्यांचे विचार तुरुंगाच्या भिंतींपलीकडे पसरत आहेत. ते लोकांच्या मनात अंकुरत आहेत, आणि ही अंकुरणारी बीजेच उद्याची लोकशाही वाचवतील.या लढ्यात सहभागी होणे म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या पाठिशी उभे राहणे नाही .ते म्हणजे भारताच्या आत्म्याच्या बाजूने उभे राहणे आहे.
✍️ – गजानन कुसुम ओंकार हरणे.
खडकी ,अकोला .
संवाद…9822942623.

लेखक, साहित्यिक,समाजसेवक, समाजसुधारक, कवी, वक्ता, विश्लेषक, प्रबोधनकार. आंदोलक ,प्रचारक,वारकरी. योगा शिक्षक आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.