▪️अमरावतीत समाजसेवक गजानन हरणे यांचा ओम शांती केंद्रात सन्मान!!
▪️व्यसनमुक्ती, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल; सीतादीदींच्या हस्ते पुष्पगुच्छ, दुपट्टा देऊन गौरव!!

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
अकोला : ( इंडिया 24 न्युज ) – समाजहिताची अखंड तळमळ, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सातत्याने केलेली जनजागृती आणि सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगर, खडकी येथील ज्येष्ठ समाजसेवक गजानन कुसुम ओंकार हरणे यांचा अमरावती येथील ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, रुक्मिणीनगर (ओम शांती केंद्र) येथे आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान – मिशन स्पंदन’ कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
ओम शांती केंद्राच्या प्रमुख सीतादीदी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, सन्मानाचा दुपट्टा व शुभेच्छा प्रदान करून गजानन हरणे यांना गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव, मानवसेवेची निष्ठा आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी केलेल्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर डॉ. खारकर, डॉ. आशाताई ठाकरे, डॉ. उल्हास भाई, डॉ. निंबोकार, ज्येष्ठ पत्रकार अशोक उपाध्ये, उद्योजक डॉ. विशाल तापडिया, डॉ. रेवतीताई, डॉ. देवळेभाई, राजेश भाई, हरीश भाई तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना गजानन हरणे यांनी हा सन्मान समाजपरिवर्तनासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येक समाजसेवकाचा असल्याची भावना व्यक्त केली. व्यसनमुक्त, संस्कारित, नैतिकता आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारून जनजागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी गजानन हरणे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्नेह, सेवा, संस्कार आणि समाजजागृतीचा संदेश देणारा हा सत्कार सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला. कार्यक्रमाचे संचालन जयाताई ढाके तर आभार प्रदर्शन तेजेलदिदी यांनी केले. कार्यक्रमाला अनेक महिला पुरुष भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



