▪️पोलीस स्टेशन चामोर्शी येथे सायबर जनजागृती मोहीम; MRM पोर्टल बाबत मार्गदर्शन

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ :उज्वल देवनाथ
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : सायबर जनजागृती मोहीम अंतर्गत आज पोलीस स्टेशन चामोर्शी येथे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. महादेव ढाकणे साहेब यांनी पोलीस स्टेशन येथे उपस्थित सर्व अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड जवानांना नुकतेच लॉन्च झालेले MRM पोर्टल बाबत सविस्तर माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर फसवणूक झालेले पैसे कशा प्रकारे परत मिळवता येतात, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते आणि या पोर्टलचे नागरिकांना होणारे फायदे काय आहेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच आज सायंकाळी पोलीस स्टेशन चामोर्शी चे भावेश वर्गांटीवार शशी चिडे मेजर पौर्णिमा चांहदे सरक्का दुर्गम्म ठोंबरे यांनी मौजा मार्कंड मोहल्ला येथील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देऊन नागरिकांसाठी सायबर जनजागृती मोहीम राबविली.
यावेळी त्यांनी उपस्थित भाविक व नागरिकांना सायबर फसवणुकीपासून कसे सावध राहावे, म्युल खाते (Mule Account) म्हणजे काय, अनोळखी APK फाईल डाउनलोड केल्याने होणारे धोके, GRM MRM पोर्टल चा वापर, तसेच हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल CEIR पोर्टल द्वारे कसा परत मिळवता येतो, याबाबत सविस्तर माहिती दिली. MRM पोर्टलद्वारे फसवणूक झालेली रक्कम गोठवून परत मिळवण्याची प्रक्रिया त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली.
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चामोर्शी पोलिसांकडून अशा प्रकारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.



